Thursday, 1 December 2016

आपला विसराळूपणा वाढतोय का?



लक्षात राहत नाही ही आपल्यापैकी अनेकांची समस्या आहे. आपण का विसरतो किंवा लक्षात का राहत नाही याची अनेक कारणे आहेत. काही अक्षमता किंवा कुपोषण यामुळेही विस्मरण होऊ शकते.अर्थात एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या सवयीमुळेही आपली स्मरणशक्ती आपल्याला दगा देत असल्याचे लक्षात आले आहे. आश्‍चर्यकारक आहे, पण ही गोष्ट सत्य आहे. आयुर्वेदात स्मृतिभ्रंशाला स्मृतिनाश असे म्हटले जाते. आयुर्वेदाच्या मते वात आणि पित्त या दोन्हीचा असमतोल झाल्यास स्मृतिभ्रंश होतो, असा अंदाज वर्तवतात. वात दोष वाढल्याने स्मरणशक्तीमध्ये अडथळा येतो. त्यामुळे भूतकाळातील घटना आठवण्यास त्रास होतो. तर कफ दोषातील असमतोलामुळे मन उदास होण्याची प्रवृत्ती निर्माण होते. 

स्मृतिभ्रंशास कारणीभूत आजार : 
अल्झायमर सारखे आजार आपल्या स्मरणशक्तीवरच थेट हल्ला करतात. कारण या रोगात मेंदूतील पेशीच नष्ट होतात. तर हार्मोन थायरॉईडशी निगडित हार्मोनल विकारांमुळेही स्मरणशक्तीवर परिणाम होतो. त्याशिवाय आपण डोकेदुखी, औदासिन्य, झोपेच्या गोळ्या, मधुमेह, कोलेस्ट्रॉल यासारख्या काही आरोग्याच्या तक्रारींसाठी मेडिकलमधून गोळ्या घेतो तसेच काही वेदनाशामक औषधे यांच्यामुळेही स्मरणशक्तीवर परिणाम होतो. 

वयानुरूप स्मरणशक्तीचा र्‍हास : 
वयानुरूप प्रत्येकाची स्मरणशक्ती कमी होतेच असे नाही, पण बर्‍याचदा वय वाढल्यानंतर मेंदूच्या क्षीण किंवा नष्ट झालेल्या पेशी भरून काढणे शरीराला शक्य नसते. वाढत्या वयामुळे हे सहजपणे घडत असल्याने मेंदूच्या ज्या भागात आठवणी साठवल्या जातात आणि पुन्हा आठवतात तो मेंदूचा भाग क्षीण होतो. 

अमली पदार्थ आणि तंबाखूमुळे स्मरणशक्ती क्षीण :
आपल्या स्मरणशक्तीवर अमली पदार्थांच्या अतिसेवनाचा परिणाम होतो त्यामुळे ती कमजोर होते. या पदार्थांचा मेंदूवर थेट परिणाम होतो त्यामुळे समस्या निर्माण होतात. तंबाखू मळून खा किंवा धूम्रपानामुळे आपल्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. आपल्या मेंदूच्या पेशींना मिळणारा ऑक्सिजन त्यामुळे कमी होतो. 

झोप उडणे आणि स्मृतिभ्रंश :
आपल्या शरीराबरोबरच मेंदूलाही विश्रांतीची आवश्यकता असते ती झोपल्यानेच मिळते. झोप अपुरी किंवा शांत न लागल्यास मेंदूची स्मरणात ठेवण्याची आणि आठवण्याची अशा दोन्ही क्षमतांवर परिणाम होतो. आपण जेव्हा झोपतो तेव्हाच मेंदू दिवसभरातील घटना स्मरणात ठेवतो, पण ही प्रक्रिया माणूस पुरेसा किंवा अपुरा वेळ झोपल्यास खंडित होते. 

ताणाचा स्मृतीवर परिणाम : 
तणाव आणि औदासिन्य या दोन्हींमुळे स्मृतिभ्रंश होऊ शकतो. आपल्यावर असलेला कोणत्याही प्रकारचा ताणा मेंदूच्या गोष्टी स्मरणात ठेवण्याच्या क्षमतेमध्ये हस्तक्षेप करतो.

डोक्याच्या जखमांमुळेही स्मृतिभ्रंश : 
डोक्याला झालेली गंभीर दुखापतही स्मृतिभ्रंशाचे कारण ठरते. एखाद्या व्यक्तीला अपघातात मेंदूला दुखापत झाल्यास भूतकाळातील गोष्टी आठवणे कठीण जाते. अशा व्यक्तीवर उपचार केल्यानंतर त्याची स्मृती परत येऊ शकते, पण काही गंभीर रुग्णांच्या बाबतीत मात्र स्मृती कायमचीच नष्ट होऊन जाते. 

काही पोषक घटकांच्या कमतरतेचा परिणाम :
‘बी’ जीवनसत्त्वाच्या समूहातील बी 12 हे जीवनसत्त्व नसांच्या सर्वसाधारण चलनवलनासाठी आवश्यक असते, पण त्याची कमतरता असल्यास गडबड होणे किंवा डिमेन्शियासारखे आजार होण्यास कारणीभूत ठरतात. आपल्या जेवणात नैसर्गिक स्रोतांपासून मिळणारे बी 12 हे जीवनसत्त्व 2.4 मायक्रोग्रॅम्स इतक्या प्रमाणात मिळाले पाहिजे. बी 12 जीवनसत्त्व हे दूध आणि दुधाचे पदार्थ, मांस, मच्छी आणि फोर्टीफाईड सिरिल्स या नैसर्गिक स्रोतांमध्ये आढळते. मात्र अतिगोड आणि जड पदार्थ, मसालेदार आणि तळलेले पदार्थ, मद्यपान, मांस आणि प्रक्रिया केलेले पदार्थ हे सर्व मेंदूच्या क्रियाशीलतेच्या दृष्टीने हानिकारक आहेत कारण या पदार्थातून हे विषारी द्रव सोडले जातात ते मेंदूसाठी हानीकारक असतात.

Source :- http://www.pudhari.com

No comments:

Post a Comment