Thursday 1 December 2016

महासत्तेला नमवणारा महानायक-फिडेल कॅस्ट्रो/ Fidel Castro




अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेला नमवणारे फिडेल कॅस्ट्रो जीवंतपणीच दंतकथा बनले होते. ५० वर्षात अमेरिकेच्याचे दहा राष्ट्राध्यक्षांना पुरून उरलेले. सीआयएने त्यांच्या खुनाचे जवळपास  ६३० कट रचले आणि त्यातील एकही कट कधीच यशस्वी झाला नाही. समाजवाद किंवा मरण ही घोषणा देणाऱ्या कॅस्ट्रो यांचे आज निधन झाले. जगभरातील क्रांतिकारकांचे प्रेरणास्त्रोत असलेल्‍या कॅस्ट्रो यांच्या निधनाने एक महापर्व संपले आहे. 

फिडेल कॅस्ट्रो कडवे समाजवादी होते.  शीतयुद्ध काळात ते उघडपणे रशियाच्या बाजुने होते. १९६२ ला रशियाची क्षेपणास्त्रे त्यांनी क्युबाच्या भूमीत तैनात करण्याची परवानगी दिली होती. फ्लोरिडापासून फक्त ९० मैल अंतरावर असलेला क्युबा हा लहानसा देश भांडवलशाही व्यवस्थेचा पाईक असणाऱ्या अमेरिकेच्या विरोधात उभे टाकतो आणि अमेरिकेला नमवतो ही बाबच त्या काळात जगभरातील समाजवाद्यांना मोहिनी घालत होती. 
 अमेरिकेच्या पाठबळावर चालेले  फुल्गेंकियो बतिस्ता यांची सत्ता उलथवून १९५९ ला कॅस्ट्रो सत्तेवर आले. कॅस्ट्रो यांनी सर्वप्रथम रशियाशी संबंध सुधारण्यास सुरुवात केली होती. अमेरिकेच्या सीआयए या संस्थेने क्युबाचा पाडाव करण्यासाठी बे ऑफ पिग्ज ही मोहीम १९६१ ला आखली होती. पण क्युबाच्या सैन्याने अमेरिकेच्या सैन्यांचा फक्त ३ दिवसांत पराभव केला. अमेरिकेसाठी ही फार मोठी नाचक्की होती. या युद्धाचे थेट नेतृत्व कॅस्ट्रो यांनी केले होते. या यशामुळे  कॅस्ट्रो  महानायक बनले होते.  
 ‘सीआयए’ने त्यानंतर कॅस्ट्रो यांना मारण्यासाठी तब्बल ६३० वेळा प्रयत्न केले. त्यांच्या अन्नात विष मिसळणे, विषारी सिगरेट देणे, विषारी कोट देणे असे कितीतरी प्रयत्न झाले. पण त्यात कधीच यश आले नाही.  
 कॅस्ट्रो बऱ्याच वेळा वादग्रस्त ही ठरले. त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न ही बऱ्याच वेळा झाला. त्यांचे तब्बल ३५ हजार महिलांशी संबंध होते, अशा बातम्या ही काही वर्षांपूर्वी झळकल्या होत्या. वादग्रस्त वक्तव्यांमुळे ही ते चर्चेत असायचे. ‘क्युबातील वेश्याही पदवीधर आहेत,’ असे वक्तव्य त्यांनी करून वाद ओढवून घेतला होता. 
 कॅस्ट्रो यांना सिगारचा मोठा शौक होता. हवान सिगार ही त्यांची आवडती सिगार होती. सिगारचा एक बॉक्स त्यांच्याकडे असायचा. ‘या बॉक्समध्ये अशी वस्तू आहे की ती मी माझ्या शत्रूलाही देऊ शकतो,’ असे ते म्हणत असत. आरोग्याच्या कारणांवरून त्यांनी १९८५ ला सिगार ओढणे बंद केले. 
 पोटाच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यामुळे ३१ जुलै २००६ ला त्यांनी त्यांचा भाऊ राऊल कॅस्ट्रोला राष्ट्रपती पदाची जबाबदारी दिली होती. १९ फेब्रुवारी २००८ ला त्यांनी राष्ट्रपतीपद पुन्हा कधीही स्वीकारणार नाही अशी घोषणा केली. त्यानंतर २४ फेब्रुवारी २००८ ला राऊल यांना राष्ट्रपती पदी नियुक्त करण्यात आले. 
Fidel Castro

Source :- www.pudhari.com

No comments:

Post a Comment