Wednesday 7 December 2016

‘बारकोड’ म्हणजे काय? / what is barcode ?


आजकाल ‘व्हॉट्सअॅप’वर चिनी बनावटीच्या वस्तूंबद्दल अनेक संदेश फिरत आहेत. त्यात प्रामुख्याने बारकोडवरून चिनी बनावटीच्या वस्तू कशा ओळखायच्या हा संदेश सातत्याने वाचनात येत आहे. चीनमध्ये उत्पादित दूध व दुधाच्या पदार्थावर आपल्याकडे बंदी आहेच; पण इतरही अनेक उत्पादने ग्राहकांसाठी पुरेशी सुरक्षित असतात असे नाही. उदा. खेळण्यांच्या रंगामध्ये सापडलेले शिसे.
अमेरिकन जनतेने तर चिनी बनावटीच्या वस्तूंचा विशेषत खाद्यपदार्थाचा धसकाच घेतला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे चीन, व्हिएतनाम, हाँगकाँग, थायलंड या देशांमध्ये ‘अन्न व खाद्यपदार्थ नियमन समिती’ अस्तित्वात नसल्याने हे देश ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका व युरोपमध्ये निर्बंध घातलेल्या घातक रसायनांचा वापर खाद्यपदार्थामध्ये सर्रास करतात. शिवाय चिनी उत्पादक तर आपल्या उत्पादनांच्या लेबलवर ‘मेड इन चायना’ असे स्पष्टपणे उल्लेख करण्याचे टाळतात.
आपण मॉल, सुपरमार्केटमध्ये जेव्हा खरेदी करतो तेव्हा बििलग काऊंटरवर बसलेला माणूस आपण खरेदी केलेल्या वस्तूंवरील बारकोड स्कॅन करून पटापट बिल बनवतो. काय बरे असतो हा बारकोड? त्यातून आपल्याला काय माहिती मिळते ते पाहूया. ‘बारकोड’ म्हणजे वेगवेगळी रुंदी व अंतर असलेल्या समांतर रेषांचा मर्यादित आकाराचा एक संच. हे दोन प्रकारचे असतात.
1) 1D बारकोड :- यात फक्त समांतर रेषांचा वापर केला जातो.
2) 2D बारकोड :- चौरस किंवा आयताकृती रचना असून त्यात २डी चिन्हे किंवा
भूमितीय आकारांचा वापर केला जातो. बारकोडमध्ये वस्तूबद्दलची माहिती जसे उत्पादन क्रमांक, साखळी नंबर, बॅच नंबर.. संकलित केलेली असते. यामुळे वितरण, साखळीतील वस्तूची ओळख व मार्गक्रमणा यांचा मागोवा घेणे सुलभ होते.
बारकोडची संकल्पना अमेरिकेतील मि. बर्नाड सिल्व्हर आणि मि. नॉर्मन वूडलॅड यांना समुद्रकिना-यावरील वाळूत रेघोटया ओढताना सुचली. १९७३मध्ये अमेरिकेतील प्रमुख उद्योजकांनी एकत्र येऊन उत्पादन ओळख करण्यासाठी एकच मानक असावे असे ठरविले. सुरुवातीला बारकोडचा वापर हा अन्न आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सुपरमार्केटमधील वितरण व्यवस्थेसाठी करण्यात आला.

जून १९७४मध्ये रिग्लेज च्युईंग गमच्या पाकिटावर प्रथम बारकोडचा वापर करण्यात आला. अमेरिकेत रिटेल वस्तूंसाठी UPC-A (युनिफॉर्म प्रॉडक्ट कोड) या कोडचा वापर केला जातो. यात बारा अंक असतात. कोणत्याही देशाचा काहीही संदर्भ दिला जात नाही. युरोप व इतर देशांमध्ये EAN-13 (युरोपियन आर्टकिल नंबरिंग) हा कोड वापरला जातो. यात तेरा अंक असतात व देशाच्या कोडचा अंतर्भाव केलेला असतो.
बारकोडमधील पहिले दोन किंवा तीन अंक हे उत्पादकाने कोणत्या अधिकृत देशामध्ये (GS1 समितीचा सभासद) उत्पादन /वस्तूचा कोड नोंदणी केलेला आहे याची माहिती कळते. म्हणजेच बारकोडमधील पहिल्या तीन अंकांवरून तो पदार्थ /वस्तू कुठे तयार केली गेली आहे याची माहिती मिळत नाही, याची कृपया सर्वानी नोंद घ्यावी. तर त्या उत्पादनाची नोंदणी कुठे केलेली आहे ही माहिती मिळते.
बारकोडवरील डावीकडचे पहिले पाच अंक उत्पादकाची ओळख देतात व सगळ्यात उजवीकडचे पाच अंक उत्पादन कोडची माहिती देतात. १९९०मध्ये अमेरिका व इतर आंतरराष्ट्रीय संघटना एकत्र येऊन जागतिक स्तरावर EAN-UPC ही संघटना स्थापन केली. GTIN म्हणजेच ‘ग्लोबल ट्रेड आयटम नंबर’ या संघटनेने विकसित केला. हा क्रमांक ८,१२,१३ किंवा १४ अंकी असतो.
१९९१ मध्ये GS1 डेटाबार तयार केला. त्याचे वैशिष्टय़ असे की, बारकोडपेक्षा तो आकाराने लहान असूनसुद्धा अधिक माहिती संकलित करतो. २००५मध्ये या संघटनेचे GS1 (ग्लोबल स्टँडर्स वन) असे नामकरण करण्यात आले. त्यामुळे या संघटनेकडून घेतलेल्या अधिकृत कोडला GS1 कोड असे म्हणतात.
GS1 बारकोड हे जागतिक स्तरावरील सर्वात सुप्रसिद्ध व मान्यताप्राप्त बारकोड आहेत. भारताने १९९६मध्ये GS1चे अधिकृत सभासदत्व घेऊन GS1 इंडियाची स्थापना केली. GS1 ही ना नफा ना तोटा सहकारी तत्त्वावर उद्योजकांनी चालविलेली जागतिक अधिकृत संघटना आहे. त्यांचे मुख्य ऑफिस ब्रसेल्स, बेल्जियम व प्रिस्टन, न्यूजर्सी येथे आहे. आज जगातील १००पेक्षा जास्त देश त्यांचे सभासद आहेत.
गेल्या तीस वर्षापासून GS1 जागतिक मानकांची निर्मिती व त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वितरण साखळीतील वापर यावर काम करत आहे. आज वैद्यकीय सेवा, खाद्यपदार्थ, पुस्तके, कपडे, संरक्षण सामग्री, ऑटोमोबाईल अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये बारकोडचा वापर केला जातो. आजकाल जागतिकीकरणामुळे जगभरातील विविध खाद्यपदार्थ आपल्याला सहज उपलब्ध होत आहेत.
जेव्हा आपण इतर देशांमधून आयात केलेली फळे विकत घेतो, तेव्हा त्या प्रत्येक फळावर स्टीकर लावलेला असतो. (उदा. सफरचंद, पेर, किवी, ड्रॅगन फ्रूट). या स्टीकरला PLU Code किंवा प्राईस लुक अप क्रमांक म्हणतात. त्यातून आपल्याला त्याबद्दलची खालील माहिती मिळू शकते.
१) चार अंकी कोड असेल तर ते उत्पादन हे पारंपरिक पद्धतीने कीटकनाशकांचा वापर करून उत्पादित केलेले असते.
२) कोडमधील शेवटची चार अक्षरे ते कोणत्या प्रकारचे फळ आहे ते दर्शवितात (उदा. केळे, ४०११)
३) जर कोड क्रमांक पाच अंकी असेल व तो ‘८’ या क्रमांकाने सुरू होत असेल, तर ते फळ किंवा भाजी जनुकीय संरचना बदलून उत्पादित केलेले असते.
४) जर पाच अंकी कोड ‘९’ या क्रमांकाने सुरू होत असेल, तर ते सेंद्रिय पद्धतीने केलेले उत्पादन असते.
स्टीकरसाठी वापरला जाणारा गम फूडग्रेडचा असतो.
पण या सगळ्यातील खरी गोम अशी आहे की, अमेरिकेत असे स्टीकर लावणे कायद्याने बंधनकारक नाही. तसेच जनुकीय संरचना बदलून केलेल्या उत्पादनाला अधिकृतरीत्या पारंपरिक उत्पादनच म्हटले जाते.
बारकोड हा उत्पादनाच्या वितरण साखळीचा (उत्पादकापासून ते ग्राहकापर्यंत) अविभाज्य घटक झाला आहे. हे GS1 हे जागतिक अधिकृत मानक असल्यामुळे उत्पादकाला आपले उत्पादन जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी सहज उपलब्ध करून देता येते. बारकोडचे उत्पादकासाठी अनेकविध फायदे आहेत ते असे.
१. माहितीचे अचूक व जलद संकलन
२. उत्तम ट्रॅकिंग यंत्रणा (जगभरात कुठेही)
३. वेळेची बचत (वस्तूंची यादी करणे).
४. कमी मनुष्यबळ
५. कमीत कमी चुका, त्रुटी
पण तुम्ही सर्वानी एक गोष्ट लक्षात घ्या की, बारकोड हा कायदेशीरदृष्टया बंधनकारक नाही. उत्पादकांनी उत्पादनाचे वितरण साखळीतील सहजसुलभ ट्रॅकिंगसाठी निर्माण केलेली ही एक खासगी तरीही जागतिक स्तरावर अधिकृत मानक असलेली यंत्रणा आहे. तेव्हा सोशल मीडियावरील विशेषत ‘व्हॉट्सअॅप’, इंटरनेट यावरील संदेशाची सत्यता पडताळून पाहा. माहिती मिळवत राहून स्वत:ला अधिकाधिक जागरूक व सुरक्षित करा.

Source :- prahaar.in/

No comments:

Post a Comment