Wednesday 7 December 2016

नॅनो तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी संगणकाच्या चिपवर मेंदू तयार केला - चेन्नुपाटी जगदीश


विश्रांती कमकुवत माणसाला लागते, मला नाही. तुम्ही म्हणाल तर वैज्ञानिक संशोधन करताना मुळीच ताण येत नाही, मला तर त्यात गंमत वाटते.. जर तुम्हाला ताण येत असेल तर तुम्हाला विज्ञानातील गंमत उमगलेली नाही असेच समजा हवं तर.. ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाचे भौतिकशास्त्रज्ञ व नॅनोतंत्रज्ञ चेन्नुपाटी जगदीश यांचं हे सांगणं म्हणजे अनुभवाचे बोलच. ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा त्या देशातील सर्वोच्च सन्मान त्यांना मिळाला आहे.

ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सटिीतील लोकप्रिय प्राध्यापक, ४० विद्यार्थ्यांचे पीएच.डी. मार्गदर्शक, नावावर पाच अमेरिकी पेटंट, पाचशे शोधनिबंध ही त्यांची संपत्ती. जगदीश यांचा जन्म आंध्र प्रदेशातला. लहान असताना त्यांना काही कमतरतेने शाळेपर्यंत जाता येत नव्हते, पण तीच दुर्बलता त्यांची सबलताही ठरली. आज त्यांनी देशाच्या सीमा ओलांडून जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. लहानपणी ते कंदिलावर अभ्यास करीत असत. शाळेत जाता येत नव्हते म्हणून वडिलांनी त्यांना गणित व विज्ञानाच्या शिक्षकांकडेच वास्तव्यास ठेवले. पहाटे चारला उठून रोज अभ्यास असा दिनक्रम. परिस्थितीने घडवल्याने त्यांचा स्वभाव साधा, सरळ, मनमोकळा, कुणालाही मदतीस तत्पर, अहंगंड अजिबात नाही. आज ते आघाडीचे नॅनोतंत्रज्ञ आहेत. नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी नवीन प्रकारचे लेसर शोधले आहेत. त्यांचा वापर दळणवळण व कमी वजनाच्या सौर विजेरीत केला जातो.

नॅनो तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी संगणकाच्या चिपवर मेंदू तयार केला आहे, त्यात न्यूरोमॉíफक सेल म्हणजे कृत्रिम न्यूरॉन्सना तुम्ही प्रशिक्षित करू शकता, असे त्यांचे मत आहे. यातून संगणकाच्या वेगात बरेच बदल करता येऊ शकतील. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण व गणित या विषयावर भारताने भर दिला नाही तर तो मागे पडेल, कारण या विषयातील ज्ञान असलेले लोकच अभिनव उद्योग, तंत्रज्ञान व ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेत यशस्वी होतात, असा त्यांचा सल्ला आहे. ते आंध्रातील गुंटूरच्या नागार्जुन विद्यापीठातून बी.एस्सी. झाले. वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठातून एम.एस्सी. (तंत्रज्ञान) ही पदवी घेतली. नंतर दिल्ली विद्यापीठातून पीएच.डी. करून ऑस्ट्रेलियाला गेले. कॅनडातही त्यांनी काही काळ संशोधन केले. किमान वीस देशांचे ते नॅनो तंत्रज्ञान सल्लागार आहेत. त्यांचे पाचशे शोधनिबंध प्रसिद्ध असून क्वांटम डॉटस, नॅनोवायर्स, क्वांटम डॉट लेझर्स, क्वांटम डॉट फोटो डिटेक्टर्स, फोटॉनिक क्रिस्टल्स, सेमीकंडक्टर ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स अशा अनेक विषयांत त्यांचे संशोधन आहे. या पुरस्काराबद्दल त्यांनी शिक्षकांचे ऋण व्यक्त केले आहेच, शिवाय विकसनशील देशांतील संशोधकांसाठी त्यांनी व त्यांच्या पत्नीने मदतनिधी स्थापन केला आहे.

Source :- www.loksatta.com

No comments:

Post a Comment