Friday 2 December 2016

कडुनिंब आणि त्याचा आरोग्यासाठी उपयोग



आयुर्वेदामध्ये काही घरगुती उपायदेखील सापडतात. कडुनिंबाचेही आयुर्वेदामध्ये काही औषधी उपयोग सांगितले आहेत. अगदी पुराण काळापासून अनेक आजारांमध्ये कडुनिंबाचा वापर केला जातो. आजही अनेक औषधांमध्ये कडुनिंबाच्या पानांचा रस किंवा या झाडाच्या इतर भागांचा वापर केला जातो. कडुनिंबाची सावलीदेखील चांगली मानली जाते. कारण, हा असा वृक्ष आहे जो जास्त प्रमाणात ऑक्सीजन उत्सर्जित करतो. कडुनिंबाचे काही उपयोग इथे देत आहोत.

कडुनिंबाच्या तेलाने मालीश करण्याने अनेक प्रकारचे त्वचारोग बरे होतात. सर्व प्रकारच्या त्वचारोगांवर कडुनिंबाचा लेप लावला जातो. कडुनिंबाच्या काडीने दात घासल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात. मुखदुर्गंधी नाहीशी होते. यामध्ये दुप्पट सैंधव मीठ टाकून दात घासल्यास पायरिया, दात-दाढ दुखणे इत्यादी तक्रारी नाहीशा होतात. कडुनिंबाची पाने चघळल्याने रक्त शुद्ध होते आणि त्वचा निरोगी व चमकदार होते. कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून हे पाणी थंड करून अंघोळ केल्याने त्वचारोग नाहीसे होतात. मलेरिया झाला असल्यास कडुनिंबाच्या सालीचा काढा करून त्यामध्ये धणे आणि सुंठपूड मिसळून घेतल्याने लवकर बरा होतो.
 
मलेरियाच्या डासांना दूर ठेवण्यासाठीदेखील कडुनिंबाचा उपयोग होतो. जिथे कडुनिंबाची झाडे असतील तिथे मलेरियाचा प्रसार होत नाही. कडुनिंबाची पाने जाळून धूर केल्याने डासांच उपद्रव कमी होतो. कडुनिंबाचा लेप केसांना लावल्यास केस चांगले राहतात आणि केस गळणेदेखील थांबते. कडुनिंबाची पाने आणि बोराची पाने पाण्यात उकळा. थंड झाल्यावर याने केस धुवा. काही दिवसांसाठी असा प्रयोग केल्यास केस काळे, लांब होतील आणि केस गळणेदेखील कमी होईल. कडुनिंबाचा रस आणि मध 2:1 या प्रमाणात घेऊन पिल्याने काविळीमध्ये फायदा होतो आणि हे मिश्रण कानांत घातल्यास कानांच्या आजारांमध्येही फायदा होतो. कडुनिंबाच्या तेलाचे पाच ते दहा थेंब रात्री झोपताना दुधातून घेतल्यास जास्त घाम येणे आणि जळजळ होणे यांसारख्या तक्रारींवर आराम मिळतो. निंबोणीचे चूर्ण बनवून एक ते दोन ग्रॅम रात्री कोमट पाण्यातून घेतल्यास अपचन होत नाही, तसेच आतडी मजबूत होतात. उन्हाळ्यात उष्माघात झाल्यास कडुनिंबाचे पंचांग फुल, फळ, पाने, साल आणि मूळ यांचे चूर्ण बनवून पाण्यातून घेतल्यास उष्माघाताचा त्रास कमी होतो.  विंचू चावल्यावर कडुनिंबाची पाने चुरगळून चावलेल्या ठिकाणी लावा. याने दाह कमी होतो आणि विषाचा प्रभावदेखील कमी होतो. कडुनिंबाच्या 25 ग्रॅम तेलामध्ये थोडा कापूर मिसळून ठेवा. हे तेल जखमेवर लावल्यास जखम लवकर भरून येते. 
 
कडुनिंबाच्या निंबोणीपासून बनवलेले तेल भाजल्यामुळे झालेल्या जखमांवर उपयोगी पडते. जखम लवकर भरून निघते. कडुनिंबाची फुले आणि निंबोण्या खाल्ल्याने पोटविकार होत नाहीत. कडुनिंबाची मुळे पाण्यात उकळून पिल्याने ताप कमी येतो. कडुनिंबाची साल जाळून त्याची राख तुलसीच्या पानांच्या रसासोबत मिसळून लावल्यास डाग किंवा इतर त्वचारोग कमी होतात. परदेशात मधुमेहापासून एड्स, कॅन्सर अशा बर्‍याच आजारांमध्ये कडुनिंब उपयोगी ठरेल, अशा पद्धतीचे संशोधन करण्यावर भर दिला जात आहे. विविध आजारांवर कडुनिंब उपयोगी ठरत आहे. 
प्रसूतीनंतर कडुनिंबाच्या पानांचा रस काही दिवस देत राहिल्याने रक्त साफ होते, गर्भाशय आणि त्याच्या आजूबाजूच्या भागांतील अवयवांची सूज उतरते, भूक लागते, पोट साफ होते, ताप येत नाही आणि आलाच तरी त्याचा जोर चढत नाही, असे आयुर्वेद सांगतो. कडुनिंबाचा काढा बनवून स्त्रियांना प्यायला दिल्याने त्यांच्या मासिक पाळीच्या तक्रारीदेखील कमी होतात. मासिक पाळीच्या वेळी कडुनिंबाची पाने गरम करून स्त्रीच्या कमरेभोवती बांधल्यास मासिक पाळीवेळी होणारा त्रास कमी होतो. श्‍वेतप्रदराच्या त्रासामध्ये कडुनिंबाच्या पाण्याने योनीमार्ग स्वच्छ केल्याने आणि कडुनिंबाच्या सालींची धुरी घेतल्याने फायदा होतो. रक्तप्रदराच्या त्रासामध्ये कडुनिंबाच्या मुळांतील सालीचा रस जिरे टाकून प्यायल्याने रक्तस्राव बंद होतो, तसेच इतर तक्रारींदेखील कमी होतात.
 
उन्हाळ्याच्या दिवसांत कडुनिंबाची पाने उकळून गार करून या पाण्याने अंघोळ केल्यास घामोळ्यांचा त्रास कमी होतो. कडुनिंबाच्या पानांचा रस, मोहरीचे तेल आणि पाणी यांना एकत्र उकळून लावल्याने विषारी जखमादेखील बर्‍या होतात. कापलेल्या जखमेवर याच कडुनिंबाचे तेल लावल्याने धनुवार्र्ताची भीती राहत नाही.
 
कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीने बाराही महिने कडुनिंबाच्या झाडाखाली वास्तव्य केल्याने, कडुनिंबाच्या खाटेवर झोपल्यास, कडुनिंबाच्या काडीने दात घासल्यास, रोज सकाळी कडुनिंबाच्या पानांच्या रस पिल्याने, संपूर्ण शरीराला कडुनिंबाच्या तेलाने मालीश केल्यास, अंथरुणावर झोपण्यापूर्वी रोज कडुनिंबाची ताजी पाने पसरल्याने, कडुनिंबाच्या पानांचा रस पाण्यात मिसळून अंघोळ केल्याने आणि कडुनिंबाच्या तेलामध्ये कडुनिंबाच्या पानांची राख मिसळून जखमेवर लावल्यास जुन्यात जुना कोडदेखील बरा होतो. कडुनिंबाच्या हिरव्या निंबोणीचा रस डोळ्यांत घातल्यास रातांधळेपणा दूर होतो. डोळे जळजळत असतील किंवा दुखत असतील तर कडुनिंबाची पाने कानशिलावर बांधावीत. याने आराम पडतो. कडुनिंबाचा रस थोडा गरम करून ज्या डोळ्याला त्रास होत असेल, त्याच्या उलट बाजूच्या कानात घालावा. याने फरक पडेल. दोन्ही डोळ्यांना त्रास होत असल्यास दोन्ही कानांत घालावे. कडुनिंबाच्या रसाने डोळे धुतल्यास नजर स्पष्ट होते. कडुनिंबाचे लाकूड जाळून त्याच्या राखेपासून काजळ बनवून डोळ्यांत घातल्यास फायदा होतो. कडुनिंबाच्या निंबोणी लोखंडी भांड्यात बारीक कराव्यात आणि त्याचा रसाचा पापण्यांवर लेप लावावा. याने डोळ्यांची अंधुकता कमी होते. कडुनिंबाच्या पानांचा रस डोळ्यांत घातल्यानेदेखील डोळ्यांचे विकार बरे होतात.
 
कडुनिंबाचे तेल थोडे गरम करून थंड झाल्यावर कानांत घालावे. याने बहिरेपणा कमी होतो. केसांना कडुनिंबाचे तेल लावल्याने कोंडा आणि उवा नाहीशा होतात. कडुनिंबाचे तेल केसांना लावल्याने केस गळणे कमी होते; परंतु याने उष्णतादेखील वाढते. म्हणून याचा वापर प्रमाणातच करावा. दहा ग्रॅम कडुनिंबाची पाने, दहा ग्रॅम शुद्ध हिंगासोबत काही दिवसांसाठी नियमित घेतल्यास पोटातील सर्व प्रकारच्या कृमी नष्ट होतात. कडुनिंबाची पिकलेली निंबोणी किंवा फुल काही दिवसांसाठी नियमित सेवन केल्यास मंदाग्निमध्ये फायदा होतो. जनावरांना कडुनिंबाची पाने गुळासोबत खायला घातल्यास त्यांची पचनक्रिया सुधारते, तसेच आतड्यांतील किडेदेखील मरतात.
 
कडुनिंबाच्या बियांचे चुर्ण गरम पाण्यासोबत घेतल्यास साप किंवा विंचवाचे विष उतरते. कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून किंवा कडुनिंबाचे तेल पाण्यात मिसळून या पाण्याने फरशी पुसल्यास वातावरण शुद्ध होते. क्षयरोग, अतिसार, हृदयरोग सारख्या आजारांवरदेखील कडुनिंबाची पाने उपयोगी ठरतात. कडुनिंबाची पाने ही अ जीवनसत्त्वाचे समृद्ध स्रोत आहेत. त्यामुळे कुपोषणामध्येदेखील याचा उपयोग होतो. महिन्यातून दहा दिवस कडुनिंबाची पाने खाल्ल्याने हृदयरोग दूर होतो. 

source:- http://www.pudhari.com/

No comments:

Post a Comment